हॉटेल समोरील डिव्हायडरचीही मोडतोड
| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अनाधिकृतपणे गतीरोधक उभारले आहेत, तसेच बहुतांश हॉटेलच्या समोरच डिव्हायडर तोडण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे.
भाऊबीजेला सगळेच भाऊ आपापली वाहने घेऊन बाहेर पडले आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सर्वांनाच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. रस्त्यावर खड्डे नव्हते, रस्त्यावर कोठेच अपघात झालेला नव्हता. तरीही, वाहतूक कोंडी झाली होती. पळस्पेपासून इंदापूरमार्गावरील जवळपास 90 टक्के हॉटेल समोरील डिव्हायडर फोडल्याचे दिसून आले. तसेच, वाहनांचा वेग मंद व्हावा यासाठी गतीरोधक उभारल्याचे दिसून आले. या गतीरोधकांच्या अडथळयामुळे वाहतूक संत गतीने सुरू होती. कळत-नकळत त्यामुळे वाहतूक कोंडी ऐन दिवाळीच्या सणात पहायला मिळाली. जे गतीरोधक टाकले आहेत. त्या गतीरोधकाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणाची परवानगी आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
डिव्हायडर फोडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे सर्व होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकीकरणच्या अधिकाऱ्यांनी डोळयावर पट्टी तर बांधली नाही ना, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कॉंक्रेटीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. हे कॉंक्रेटीकरणाचे काम होताच डिव्हायडर नव्याने बांधण्यात येणार आहेत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार गतीरोधक टाकले आहेत. मात्र, जे सात बेकायदेशीर गतीरोधक टाकले आहेत ते काढण्यात येतील. त्यानंतरही कोणी नव्याने गतीरोधक टाकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
यशवंत घोटकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी