महाड बसस्थानक परिसरात बेकायदा वाहतूक

खाजगी वाहनांवर कारवाईची मागणी; पैशावरून रिक्षाचालक प्रवाशांमध्ये वाद

| महाड | प्रतिनिधी |

महाड बसस्थानक परिसरातून भाडे वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाड तालुका रिक्षा युनियन, रिक्षा चालक मालक संघ, स्वराज्य रिक्षा संघटना आदी संघटनांनी निवेदनाद्वारे महाड शहर पोलीस ठाण्याकडे केली आहे. याचवेळी महाड शहरातील रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षा स्टँडवर अथवा रिक्षा चालकांच्या गाडीत दर पत्रक असावे अशी मागणी देखील प्रवाशांकडून होत आहे.

19 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गडाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असताना काही प्रवाशांची शेवटची गाडी चुकली. त्यावेळी एका खासगी इर्टिका वाहनचालकाने त्यांना गडावर नेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांनी त्या वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी रिक्षा चालक व खासगी वाहन चालक यांच्यामध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी संतप्त महाड रिक्षाचालक व महाड तालुका रिक्षा युनियन, रिक्षा चालक मालक संघ, स्वराज्य रिक्षा संघटना आदी संघटनांच्या वतीने महाड शहर पोलिसांना निवेदन सादर करत बसस्थानक परिसरात प्रायव्हेट वाहनांकडू या खासगी व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान महाडमध्ये बेकायदेशीर भाडे वाहतूक होत असून याबाबत यापूर्वीही शहर पोलीस, शहर वाहतूक पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, रायगड पोलीस अधीक्षक तसेच पेण आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप संघटनानकडून करण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारांमुळे अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही सर्व संघटनांनी उपस्थित केला आहे.

दर फलक लावण्याची मागणी
महाड शहरालगत असणाऱ्या दादली, शिरगाव, गंधारपाले, साहिल नगर, मोहप्रे, करंजखोल, लाडवली, सुंदर वाडी, चांभारखिंड या गावांमध्ये तसे शासकीय रुग्णालयामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना देखील या रिक्षा चालकांकडून दर निश्चित नसल्यामुळे पैशावरून सतत रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद होण्याचे प्रकार घडलेले आहेत. याप्रकरणी आता प्रवाशांकडून देखील अशी मागणी होत आहे की प्रत्येक रिक्षा स्टँडवर अथवा रिक्षामध्ये जवळच्या प्रवासाला किलोमीटर मागे किती भाडे असावे याचे दर फलक लावण्याची मागणी केली आहे.
Exit mobile version