महामार्गावर अवैधरित्या ट्रेलर पार्किंग

अवैध धंदेही सुरु; नागरिकांत चिंता

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील पागोटे-धुतुम दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला दुतर्फा असलेल्या महसुली व गुरेचरण अशा सुमारे 45 एकर जागांवर शासकीय नियमांना बगल देत अवैधरित्या कंटेनर पार्किंग, कंटेनर यार्ड, गॅरेज, ढाबे उभारण्यात आले आहेत. शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेल्या या अवैध जागांवर समाजकंटकांनी अवैध धंदेही सुरू करण्यात आल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

जेएनपीए-पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर कंटेनर मालाची वाहतूक होत असते. पागोटे-धुतुम दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या महसुल विभागाची 45 एकर मोकळी व गुरेचरणाची आरक्षित जागा आहे. या जागा 2013 मध्ये महसुली विभागाने खासगी विकासकाला कोळंबी संवर्धन प्रकल्प व लागवडीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या होत्या. मात्र, खासगी विकासकाने लागवड व मत्स्यपालन व्यवसायासाठी दिलेल्या जागेवर अनधिकृतपणे कंटेनर यार्ड उभारले होते. भाडेतत्वावर दिलेल्या शासकीय जागेचा वापर पुर्व परवानगीशिवाय वाणिज्य कारणासाठी सुरू करण्यात आल्यानंतर याविरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या.

या आरक्षित जागांवर काही समाजकंटकांनी अवैधरित्या अनेक कंटेनर पार्किंग, कंटेनर यार्ड, गॅरेज, ढाबे उभारलेले आहेत. वाहनचालकांना दमदाटी प्रसंगी शिवीगाळ, मारहाण करून जबरदस्तीने अवजड वाहने पार्किंग करण्याची सक्ती केली जाते. त्यांच्याकडून पार्किंगच्या नावाखाली पैसेही वसूल केले जातात. तर, अवैधरित्या उभारण्यात आलेले ढाबे, कॅन्टीनमधुन राजरोसपणे दारु, अंमली पदार्थाची विक्री केली जात आहे. यामुळे अशी अवैध ठिकाणे समाजकंटक आणि माफिया, गुंडांचे अड्डे बनत चालले आहेत. याकडे संबंधित शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने काही विपरीत घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांमधून चिंताही व्यक्त केली जात आहे.

जेएनपीए परिसर आणि उरण, न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा अवैध धंदे करणार्‍यांवर कारवाईची मोहीम सुरुच असते.

– एसीपी डॉ. विशाल नेहूल, न्हावाशेवा बंदर पोलीस


महसूल विभागाच्या मालकीच्या जागेत अवैधरित्या पार्किंग, यार्ड, गॅरेज, ढाबे उभारण्यात आले असतील तर कारवाई करुन काढून टाकण्यात येतील.

– महसूल विभाग अधिकारी

Exit mobile version