| मुंबई | प्रतिनिधी |
शहरातील एलपीजी गॅसच्या काळ्याबाजारावर आळा घालण्यासाठी नागरी पुरवठा विभागाने शनिवारी (दि.18) विशेष धाड मोहीम राबविली. या मोहिमेत डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैधरित्या एलपीजी गॅसचा वापर होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत चेंबुर आणि अनुशक्तीनगर (देवनार) परिसरात दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
चेंबुर परिसरातील पेस्तमसागर रोडवरील विश्वसंगम टॉवरमधील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवर धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. 33 ‘ई’ चेंबुर येथील सहाय्यक शिधावाटप अधिकारी जितेंद्र देशमुख, अमर सकपाळ तसेच निरीक्षक भगवान वांडेकर, निलकंठ येसने आणि प्रकाश पराते यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपासादरम्यान एकूण 8 एलपीजी सिलेंडर्स विनाबिल अवैधरित्या प्राप्त करून वापरत असल्याचे आढळले. या प्रकरणी सुमारे 25,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टिळकनगर (चेंबुर) पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, देवनार परिसरातील अर्जुन सेंटर येथील डॉमिनोज पिझ्झा सेंटरवरही धाड टाकण्यात आली. शिधावाटप कार्यालय क्र. 49 ‘ई’ अनुशक्तीनगर येथील शिधावाटप अधिकारी जगन्नाथ सानप, सहाय्यक अधिकारी श्रीमती सोनाली धांदरणेकर तसेच निरीक्षक देवयानी पवार, नंदिनी इंगोले, राकेश पाटील आणि सुनील आढाऊकर यांच्या पथकाने कारवाई केली. येथे एकूण 19 एलपीजी सिलेंडर्स विनाबिल वापरात असल्याचे आढळून आले. सुमारे 49,117 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंडी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606