। पनवेल । वार्ताहर ।
खारघर परिसरात अनेक ठिकाणी अवैधरित्या गावठी दारूची निर्मिती व विक्री राजरोसपणे सुरू आहे. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. खारघरमधील कोपरा गावात अवैध रीतीने गावठी दारूधंदे जोरात सुरू आहेत. एखादी कारवाई केल्यानंतर हे धंदे पुन्हा सुरू कसे होतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या गावठी दारू धंद्यांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. गावठी दारूचा सर्वात जास्त गरीब, हातावर कमवणारे व आदिवासी समाजावर होत आहे. यामुळे कौटुंबिक हिंसाचार वाढले आहेत. तसेच ही अवैध गावठी दारू रासायनिक प्रक्रिया करून बनवण्यात येते. त्यामुळे त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणूनच हे अवैध गावठी दारू धंदे बंद करावेत, अशी मागणी येथील शहरवासियांनी केली आहे. येथील आसपासच्या परिसरामध्ये गावठी दारू गाळली जाते. गावठी दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांनादेखील आहेत. परंतु, अवैध मद्य वाहतूक रोखण्यात अद्याप समाधानकारक कारवाई झालेली दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
व्यसनाधीनता आणि गरिबी यामुळे गावठी, हातभट्टीसारख्या दारूच्या आहारी येथील हातावर कमवणारे नागरिक गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता अशा अवैधरित्या उत्पादित होणार्या दारूविरोधात व्यापक कारवाई होणे गरजेचे आहे.
घातक रसायनांचा वापर
सुरुवातीला अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी नवसागर व काळा गूळ यांसारख्या घटकांचा वापर केला जात होता. मात्र, अलीकडच्या काळात मात्र गावठी दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डबे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे.