अवैध गावठी दारु विक्री जोरात

दारू विक्रेत्यांना आशीर्वाद कुणाचा?

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यामध्ये पेण, दादर सागरी आणि वडखळ हे तीन पोलीस ठाणी येत असून, दादर सागरी आणि वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गावठी दारूची विक्री होत आहे. वेळोवेळी ग्रामस्थांनी तक्रार करूनदेखील गावठी दारू विक्रेत्यांना लगाम घालण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आज सर्रास ग्रामीण भागात गावठी दारूची विक्री होत असल्याने ही अवैध दारू विक्री कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, असा सवाल सर्वसामान्य जनता करत आहे.

वडखळ पोलीस ठाण्याच्या भौगोलिक हद्दीचा विचार केल्यास इतर दोन पोलीस ठाण्यांपेक्षा विस्तीर्ण आहे. वाशी खारेपाट पूर्ण, शिर्की खारेपाट पूर्ण, पाबळ खोरे आणि आमटेम-कोलेटी यामध्ये मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा आणि डोंगराळ भागाचा समावेश आहे. या विस्तीर्ण क्षेत्रात दुर्गम भाग असल्याने या भागात हातभट्टीचे व्यवसाय चालतात. हातभट्टी व्यवसायावर पोलीस खात्यापेक्षा कर व शुल्क विभागाचा वचक असणे गरजेचे आहे; परंतु असे होत नाही. पोलीस यंत्रण कमी पडत असल्याने गावनिहाय पोलिसांना मदत करण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. वडखळ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 36 पोलीस पाटील आहेत. याचाच अर्थ, जवळपास प्रत्येक गावात पोलीस पाटील आहेत. त्यांनी गावात चाललेल्या अवैध धंद्यांची माहिती देणे गरजेचे आहे. परंतु, पोलीस पाटील आपल्या कामात कामचुकारपणा करत असल्याने गावठी दारू विक्री अवैधपणे सुरू आहे, असे बोलले जात आहे.

दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनखार, उर्नोली, दादर ते रावेपासून खारपाडा, जिते ही गाव येतात. या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण 16 पोलीस पाटील असणे गरजेचे आहे; परंतु 11 जागा रिक्त आहेत. फक्त पाच पोलीस पाटील कार्यरत आहेत. पेण पोलीस ठाण्याचा विचार करता या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ण पूर्व विभाग येत असून, पूर्व विभाग हा दुर्गम भाग आहे. वाड्या-वस्त्यांवर पोलिसांना पोहोचणे शक्य होत नाही. या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात 32 पोलीस पाटील आहेत. एकंदरीत काय तर, तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जवळपास 80 ते 85 पोलीस पाटील कार्यरत आहेत. मात्र, यांना आपल्या जबाबदारीची विसर पडल्याने आज गावोगाव अवैध धंद्यांना ऊत आला आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तीनही पोलीस ठाण्यांकडून दारू विक्री होऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न केले जात असून, पोलीस कर्मचार्‍यांच्या अभावी पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याची चर्चा आहे.

Exit mobile version