मला माफ करा…! दिलेली आश्‍वासनं पुर्ण न केल्यामुळे आमदारांनी मागितली माफी

। अलिबाग । प्रतिनिधी

मागील निवडणूकीत जिंकून येण्यासाठी जनतेला जी आश्‍वासने दिली होती. त्या आश्‍वासनांची पुर्ती करण्यास आमदार महेंद्र दळवी अपयशी ठरले आहेत. गेल्या पाच वर्षात अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघातील बेराजगारी दूर करण्यात अपयशी ठरलो, युवकाच्या हाताला काम देऊ शकलो नाही, अशी कबूली देत आ.महेंद्र दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी मतदारांची माफी मागितली. मात्र जनता सुज्ञ आहे. पुन्हा फसवणूक करण्याची संधी देणार नसल्याचा चंग जनतेनं बांधला असून पुन्हा अशा अकर्तृत्वान व्यक्तीला निवडून द्यायचे नाही, असा निर्धार मतदारांनी केल्याचे चित्र आहे.

राज्यात सुरुवातीला महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ता उपभोगत असताना शिंदे गटाने फारकत घेत भाजपासोबत वेगळी चुल मांडली. त्यानंतर अजित पवार गटालासोबत घेतले. गेल्या अडिच वर्षात सत्ता भोगताना जनतेच्या कामाकडे महायुती सरकारचे दुर्लक्ष झाले. पाडापाडीच्या राजकारणातच त्यांचा अधिक वेळ गेला. त्यामुळे जनतेचा विकास करण्याचे राहून गेले. विशेष म्हणजे अलिबाग-मुरुड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी याची कबूली दिली आहे.
उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघातील बेराजगारी दूर करण्यात अपयशी ठरलो, अशी कबूली महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांनीच दिली. तसेच आमदारकीच्या कालावधीत काही कमतरता राहीली अथवा काही चूक झाली असेल, तर जनतेची माफी मागतो, असेही दळवी म्हणाले. दळवी यांच्या या वक्तव्याने मतदारांमध्ये कमालाची आक्रोश पहायला मिळत आहे. जनतेच्या विकासासाठी, युवकांचे, शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे, महिलांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मतदारांनी दळवी यांना 2019 मध्ये निवडून दिले होते. मात्र त्यांनी पाच वर्षात काहीच केले नसल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे अशा नाकर्त्या उमेदवाराला पुन्हा विधानसभेत कशाला पाठवायचे, असे मत अलिबाग-मुरुड मतदारसंघातील मतदारांचे झाले आहे.

बंडखोरी खपवून घेणार नाही- दिलीप भोईर यांना महेश मोहिते यांचा टोला

सध्या महायुतीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदेगट यांच्यामध्ये राडा पहायला मिळत आहे. अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये भाजपची बांधणी मी केली आहे. काल परवा भाजपमध्ये आलेले भाजपची बांधणी मी केल्याचा दावा करीत आहेत. भाजप, शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी ही महायुती आहे. महेंद्र दळवी यांच्यासोबत महायुती आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबतच आहेत. बंडखोरी करून दिलीप भोईर मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ही बंडखोरी पक्ष कधीही खपवून घेणार नाही. बंडखोरी करणार्‍यांना जागा दाखविली जाणार आहे. त्यानंतर पक्ष पुढील भुमिका घेईल, असा टोला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांना महेश मोहिते यांनी लगावला आहे.
तुम्हाला बाप आहे कि, नाही; मतदारांना केला सवाल
आ. दळवी यांच्या सभेत रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष जगदिश गायकवाड यांची भाषणात जीभ घसरली. भर उन्हात उपस्थितांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ‘अरे तुम्हाला बाप आहे, की नाही’ असे बेताल वक्तव्य करीत मतदारांचा अपमान केला. त्यामुळे दळवींच्या व्यासपीठावर गायकवाडांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपच्या पदाधिकार्‍यांना धमकी
दळवींच्या प्रचाराला तसेच सभांना येत नसल्याच्या कारणावरुन भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भाजपच्याच पदाधिकार्‍याला बेदम मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही पक्षाच्याच अधिकर्‍यांना शिंदे गटाच्या व्यासपीठावरुन पुन्हा धमकी देण्याचा प्रताप अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केला आहे. यावरुन मोहिते स्वःपक्षाला भीक घालत नसल्याचे स्पष्ट झाले.
Exit mobile version