बारा छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची निवड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलेला वाव देण्यासाठी इमेज कॅलेंडरने सात वर्षाची परंपरा जपली आहे. यंदाही 2025 चे इमेज कॅलेंडर वेगळ्या रुपात तसेच निसर्गाने नटलेल्या पुरातन मंदिरांच्या छायाचित्रांची छबी दिसणार आहेत. जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या शेकडो छायाचित्रांमधून 12 छायाचित्रांची निवड या कॅलेंडरमध्ये करण्यात आली आहे. हे कॅलेंडर लवकरच नागरिकांच्या भेटीला येणार आहे.
अलिबागमधील छायाचित्रकार रमेश कांबळे, जितू शिगवण आणि समीर मालोदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या इमेज कॅलेंडरचे यंदा सातवे वर्ष आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशी पर्यटन व निसर्गाने नटलेल्या परिसराची छायाचित्र या कॅलेंडरच्या माध्यमातून नागरिकांना पहावयास मिळत आहेत. यावर्षी इमेज कॅलेंडरमध्ये निसर्गाने नटलेल्या पुरातन मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. या कॅलेंडरमध्ये आपली छायाचित्रे यावीत यासाठी जिल्ह्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांकडून छायाचित्रे मागविण्यात आली होती. शेकडो स्पर्धकांनी छायाचित्रे पाठविली होती.
परीक्षकांच्या माध्यमातून या छायाचित्रांची पडताळणी करण्यात आली. यामुळे 2025 च्या इमेज कॅलेंडरमध्ये अलिबागमधील वैभव शिंदे, खंडाळेमधील पंकज गोंधळी, महाडमधील कल्पेश पाटील, अलिबागमधील सचिन आसरानी, पालीमधील नितीन शिर्के, माणगांव-नांदवीमधील प्रफुल्ल पवार, वरसोली येथील परिणिती कांबळे, महाडमधील प्रीतम सकपाळ, पेणमधील समाधान पाटील, खोपोलीमधील अविनाश राऊत, ढवरमधील निलेश पाटील, मुरूड-एकदरा येथील भारत रांजणकर यांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. लवकरच हे कॅलेंडर नागरिकांच्या घरातील भिंतीवर दिसणार आहेत.