| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष पटकारे यांनी महाराष्ट्र शासन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अर्धवट असताना 15 मेपासून अचानक खारपाडा टोलनाका सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता टोलवसुली सुरू करण्यात आल्याचा आरोपही पटकारे यांनी केला आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या 84 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आजही पूर्ण झालेले नाही. 2009 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2014 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सुरुवातीला 922 कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प रखडल्यामुळे त्याची किंमत 1200 कोटी रुपयांवर गेली. दरम्यान, निकृष्ट दर्जाचे काम आणि विलंबामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, गुजरात तसेच उत्तर महाराष्ट्रातील हजारो प्रवासी दररोज गोव्याकडे या महामार्गाने प्रवास करत असतात. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून कोकणवासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी संतोष पटकारे यांनी केली आहे.
महामार्गावरील टोलवसुली तात्काळ बंद करा: संतोष पटकारे
