मोरयाच्या जयघोषात रायगडात बाप्पांचे विसर्जन

मुरूड तालुक्यात 3000 गौरी-गणपतींचे विसर्जन
मुरूड | वार्ताहर |
मंगळवारी मुरूड तालुक्यात घरगुती सुमारे 3000 गौरी गणपतींचे विधिवत आणि शांततेत समुद्र किनारी आणि नद्यांतून विसर्जन करण्यात आले. अतिवृष्टचा इशारा असल्याने सायंकाळी 5 वाजल्या पासून विसर्जन सोहळा सुरू झालेला दिसत होता.गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त भावना व्यक्त करीत गणपती बाप्पाना जड अंतकरणाने निरोप देण्या साठी किनार्‍यावर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त होता.
सकाळ पासून ऊन, पावसाचे सावट आणि आकाशात मेघ दाटून येत होते.मुरूड, एकदरा, परिसरातील मूर्तींचे मुरूड समुद्र किनार्‍यावर विसर्जन करण्यात आले नांदगाव, बोर्ली, काशीद,बारशिव, आगरदंडा, कोर्लई, सावली, खामदे मिठागर परिसरातील गणेश मूर्ती समुद्रकिनारी विसर्जित करण्यात आल्या.खार खारआंबोली, तेलवडे, शिघ्रे, वाणदे, जोसरांजन, उंडरगाव, वळके, सुपेगाव चोरढे , आदाड व अन्य गावातील मूर्ती नदीच्या पात्रातून विसर्जन करण्यात आल्या.मुरूड किनार्‍यावर विसर्जन मार्गावर नगरपरिषद तर्फे विद्युत दिव्यांची व्यवस्था आणि निर्माल्य गोळा करण्यासाठी कुंभ ठेवण्यात आले होते.कोरोना पार्श्‍वभूमीवर दक्षता राखण्यात आल्याचे दिसत होते.डोक्यावर गणेश मूर्ती घेऊन जात असलेले भक्त देखील प्रकर्षाने दिसून आले.चाकरमानी मंडळींच्या मुंबई- पुण्यात परतीसाठी मुरुड एस टी आजाराने चोख व्यवस्था केली आहे.

Exit mobile version