रायगडात दहा दिवसांच्या बाप्पांचे जयघोषात विसर्जन

। रायगड। वार्ताहर।

गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया या गजरात शुक्रवारी गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… गणपती गेले गावाला…चैन पडेना आम्हाला या गजरात रायगडात दहा दिवसांच्या गणरायाला अनंत चतुर्थीला गुरुवार (दि.28) भावपूर्ण निरोप देण्यात आला. अनेकांनी पारंपरिक पद्धतीने कोव्हिड नियमांचे पालन करीत उत्साहात हा गणेशोत्सव साजरा केला. यावर्षीही विशेष करून ग्रामीण भागात अनेक गणेशभक्तांनी वाजत, गाजत, नाचत गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली.

दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप
दहा दिवसाच्या उत्साहानंतर जड अंतः करणाने गुरुवारी जिल्ह्यात बाप्पाला निरोप देण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जिल्ह्यात 17 हजार 543 मुर्तींचे विसर्जन झाले. त्यात घरगुती एक हजार 7393 व सार्वजनिक 150 गणेशमुर्तीचा समावेश आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या अशी घोषणा देत आरती, पूजा करीत नदी, तलाव, व समुद्रात मुर्तींचे विसर्जन केले. यावेळी गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांच्या आलोट गर्दीबरोबरच वरूणराजाने देखील हजेरी लावली.


जिल्ह्यातील काही भागांमध्ये मंडळाच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न आला. त्यात झाडे लावा झाडे जगवा, मुलगी शिकली प्रगती झाली असे अनेक संदेश उपक्रमातून देण्यात आले. तसेच काही मंडळामार्फत चंद्रयान, देशभक्तीचे देखावे उभे करण्यात आले. दहा दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी ( दि. 28) रोजी वाजत गाजत निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरासह पारंपारिक वाद्यांच्या तालावर अलिबागसह अनेक भागात मिरवणूक काढण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी साडेसहा, तर काही ठिकाणी रात्री अकरा तर काही ठिकाणी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

कर्जतमध्ये 1114 गणरायांना निरोप
कर्जत तालुक्यातील 17 सार्वजनिक व 1097 खासगी अशा एकूण 1114 गणरायाना भावपूर्ण निरोप देण्यात आला. भाविकांनी नदी तसेच गावाजवळ असलेल्या तलाव व ओढ्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करीत बाप्पाला निरोप दिला. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक 9, खासगी 424. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 सार्वजनिक, खासगी 665 आणि माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक एक व खासगी आठ अशा एकूण 1114 गणेशमूर्तींचे पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले.


मंगल सोहळ्याची सांगता
माथेरान शहरात चैतन्यमय वातावरणात सुरू झालेला गणेशोत्सव सोहळ्याची अनंत चतुर्दर्शीला गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर याच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देत मंगल सोहळ्याची सांगता झाली. शहरात दहा दिवसांचे एकूण 14 गणपती बाप्पा विराजमान होते. विसर्जनस्थळी माथेरान नगर पालिकेमार्फत योग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तर येथील पोलीस प्रशासन देखील विसर्जनस्थळी भाविकांना सहकार्य करीत होते.


माणगावात उत्साहात विसर्जन
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला या गजरात माणगावसह तालुक्यातील दहा दिवसाच्या 15 सार्वजनिक व 700 घरगुती गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या गणपती विसर्जन कार्यक्रमास अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी भेट दिली. विसर्जन ठिकाणी माणगाव नागरपंचायतीतर्फे गणेश भक्तांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत कृत्रिम विसर्जन तलावाचा उपयोग करून पर्यावरणाचे रक्षण करा, माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत निर्माल्य येथे टाकावे असा संदेश देण्यात आला होता. नगरपंचायतीतर्फे गणेश विसर्जनाची चांगली व्यवस्था करण्यात आली होती.


सुधागडात बाप्पांना साश्रुनयनांनी निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरच या, अशा जयघोषात सुधागडकरांनी अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या बाप्पांना गुरुवारी (ता.28) साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप दिला. सायंकाळपर्यंत अनेक घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पाली नगरपंचायतीने देखील विसर्जन घाटावर सुसज्ज व्यवस्था केली होती. पाली, पेडली, जांभुळपाडा, परळी, अंबा नदीत येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

मुरूडमध्ये दिमाखात विसर्जन
गेले 10 दिवस सुरू असलेल्या घरगुती गणेशोत्सवाची मुरूड तालुक्यात गुरुवारी यशस्वी सांगता झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष करीत अनंतचतुर्थी दिनी तालुक्यात सुमारे तीन हजार गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. नगरपरिषदेकडून शहरात विसर्जनाच्या तिन्ही मार्गावर विद्युत दिव्यांची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वागत कमानी,समुद्र किनारी मदतीसाठी जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक निशा जाधव आणि सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्त तैनात होता.


बोर्लीच्या राजाला थाटात निरोप
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बोर्लीपंचतन परिसरात सार्वजनिक एक तर 1305 घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेले दहा दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, त्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. बाप्पाची मिरवणुक शहरातून निघाल्यापासून दिवेआगर येथील समुद्रकिनारी पोहचे पर्यंत जल्लोषात बाप्पाच विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांची मांदियाळी दिसून आली.


अंबा घाट गणेशभक्तांनी फुलला
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला असा जयघोष करीत नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे शहर व परिसरांतील अनंत चतुर्दशीच्या 220 खासगी व 9 सार्वजनिक गणपती बाप्पांना गुरूवारी (दि. 28) भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यामुळे नागोठण्यातील अंबा विसर्जन घाट गणेश भक्तांनी फुलल्याचे यावेळी पहायला मिळाले. नागोठणे शहर व परिसरांत पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत, गाजत, नाचत बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली.


खांब विभागात अध्यात्मिक कार्यक्रम
खांब विभागात मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणरायाची घरोघरी स्थापना केल्यानंतर दररोज मनोभावे पूजन, भजन, आरती, हरिपाठ, किर्तन, जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमही मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. विसर्जनाचे दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पांना निरोप देण्यात आला.


म्हसळ्यात भावपूर्ण निरोप
तालुक्यातील दहा दिवसाच्या बाप्पांचे विसर्जन शांततेत आणि उत्साही वातावरणात करण्यात आले. तालुक्यातील सुमारे 850 घरगुती आणि म्हसळा शहरातील बंजारी समाजाचा एकमेव सार्वजनिक गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यामध्ये म्हसळा शहरातील, सुरई, म्हसळा आदिवासी वाडी, म्हसळा गौळवाड़ी येथील सुमारे 100 ते 125 बाप्पांचा समावेश होता.गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर च्या जयघोषात संपूर्ण शहरभर भक्तिमय वातावरण पसरल्याचे दिसून येत होते.


मोहोपाड्यात भक्तांचे डोळे पाणावले
रसायनी पाताळगंगा परिसरातील गणपतींना मोहोपाडा तळाव, रिस पुल, कांबे पुल, पाताळगंगा नदी, रसेश्वर घाट, वावेघर घाट, तळेगाव बारवई पुल, गुळसुंदे घाट,कासप, चावणे घाट, वाशिवली गणेश घाट आदी ठिकाणी भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी परिसरातील जवळपास 750 पेक्षा अधिक गणरायाला भक्तिभावाने निरोप देतावेळी भक्तांचे डोळे पाणावले होते. परिसरातील दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांच्या बाप्पा विसर्जनात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने रसायनी पोलिसांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version