। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या!’ असा गजर, गणेभक्तांचे पाणावलेले डोळे, तरुणांची गौराई आणि बाप्पासोबत सेल्फी काढण्याची धडपड आणि ढोल-ताशा, टाळ-मृदूंगाचा गजर असे सारे उत्साहपूर्ण चित्र गौरी गणपती विसर्जनाच्यानिमित्ताने ठिकठिकाणी पहायला मिळाले. रायगड जिल्ह्यातील गणेशभक्तांनी दोन दिवसांची माहेरवाशीण आलेल्या गौराईंना व सात दिवसांच्या गणपती बाप्पांना सोमवारी (दि.5) भावपूर्ण निरोप दिला.गणपती बाप्पा, गौराईंसोबत सेल्फी काढून घेताना गणेशभक्त दिसत होते. बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विसर्जन घाटावर भक्तांची मांदियाळी होती. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडण्यासाठी रस्ते, घाटावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. वाहतूक पोलिस, स्वयंसेवक, नगरपालिका कर्मचारी, सुरक्षा रक्षक, कर्मचारी सज्ज होते.