गतिरोधकांची तात्काळ दुरुस्ती करावी

आरपीआय आठवले गटाची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-नेरळ-कल्याण मार्ग रस्त्यावर कर्जत ते नेरळ या भागात बसविण्यात आलेल्या गतिरोधकांची सुधारणा करण्याची मागणी आरपीआय आठवले गटाने केली आहे. या भागातील गतिरोधकांचे डांबर निघून गेले असून, ते सर्व गतिरोधक धोकादायक स्थितीत आहेत आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्जत नेरळ कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. त्यात दोघांचे बळी, तर अनेक वाहनांना अपघात झाल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसविले होते.

मात्र, रस्त्यावर बसविण्यात आलेली गतिरोधकांना बनविण्यासाठी वापरण्यात आलेली डांबर नित्कृष्ट दर्जाची असल्याने गतिरोधक हे खराब होते होते. त्यात पावसाळा सुरु झाल्यापासून संपेपर्यंत तर रस्त्यावरील गतिरोधक यांची डांबर निघून जाऊन तेथे खड्डे पडत होते. याबाबत स्थानिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली. मात्र बांधकाम विभाग काही जागे होत नसल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि आरपीआय आठवले वगतच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप विभागीय कार्यलयात जाऊन निवेदन देण्यात आले आहे. पंधरा दिवसात गतिरोधक नव्याने बनवून घेतले नाहीत तर त्याच गतिरोधकांच्या बाजूला बसून आंदोलन केले जाईल, असा इशारा रायगड भूषण किशोर गायकवाड आणि किशोर जाधव यांनी दिला आहे.

दरम्यान, या रस्त्यावरील नेरळ येथे असलेल्या नेरळ विद्या मंदिर शाळेतील पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तेथे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात आले होते. मात्र, त्यास दोन महिने लोटले तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून गतिरोधक बसविले जात नाहीत आणि त्यामुळे कर्जत नेरळ मार्गावर गतिरोधक यांच्या बाजूला ग्रामस्थ आंदोलन करतील त्याचवेळी नेरळ येथे पालकदेखील रस्त्यावर बसून आंदोलन करतील, असा इशारा नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजू झुगरे यांनी दिला आहे.

Exit mobile version