कामोठ्यातील अनैतिक धंद्यांना ऊत

धंदे बंद करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची निवड झाल्यावर आयुक्तालय परिसरातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनैतिक धंद्यांना आळा बसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कामोठे पोलीस ठाणे याला अपवाद आहे का, असा सवाल उपस्थित करण्याजोगी परिस्थिती कामोठे वसाहतीत आहे.

याठिकाणी जुगाराचे अड्डे, हुक्का पार्लर, नियम धाब्यावर बसवून सुरु असलेले ढाबे, अमली पदार्थांची आणि गुटख्याची सुरु असलेली विक्री, मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेले वेश्या व्यवसाय आणि बियर शॉपीच्या नावावर खुलेआम केले जाणारे मद्यपान रोखण्यात कामोठे पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना अद्याप अपयश आले असल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेल्या अजय कांबळे यांची नुकतीच कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांच्या सूचनेनुसार झालेल्या या नियुक्ती मुळे आयुक्त भांबरे यांच्याप्रमाणेच कठोर कारवाई करून कामोठे परिसरात राजरोसपणे सुरु असलेल्या अनैतिक धंद्यांविरोधात आघाडी उघडून हे धंदे बंद करण्याचे काम श्री. कांबळे करतील, अशी अपेक्षा सामान्य कामोठेकर करीत आहेत.

हुक्का पार्लरमध्ये युवक युवतींची गर्दी
कामोठे वसाहतीत सध्या सहा ठिकाणी आयुर्वेदिक हुक्का पार्लरच्या नावावर हुक्का पार्लर चालवण्यात येत आहेत. या पार्लरमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठी गर्दी होत असून, आयुर्वेदिक जडीबुटीच्या नावावर तंबाखूजन्य पदार्थ हुक्क्यात घालून देण्याचे प्रकार या ठिकाणी करण्यात येत आहेत.

नामांकित हॉटेलचे अवैध धंदे
कामोठे वसाहतीमधील सेक्टर सहा परिसरात सायन-पनवेल महामार्गालगत असलेल्या एका नामांकित हॉटेलमधील तिसर्‍या मजल्यावर मसाज पार्लरच्या नावावर वेश्या व्यवसाय सुरु आहे. तर याच हॉटेलच्या सर्वात वरच्या भागात रात्री उशिरापर्यंत तंबाखूजन्य हुक्क्याचा धूर उडवण्याचे काम केले जात आहे.

गर्दूल्यांचे अड्डे
वसाहतीमधील उद्यान आणि मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दूल्यांचा वावर असल्याने या भागात जाणे महिला वर्ग टाळत आहेत. परिसरात होणार्‍या गर्दूल्यांच्या त्रासाविरोधात आवाज उचलणार्‍यांना धमकवण्याचे प्रकारदेखील हे गर्दूले करत असल्याने परिसरात खुलेआम अमली पदार्थ उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत आहे.

बियर शॉपीमध्ये खुलेआम मद्यपान
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात कामोठे वसाहतीत सर्वाधिक मद्य विक्री करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. परमिट रूम, देशी दारू विक्री केंद्र, सर्व प्रकरची दारू विक्री केंद्र तसेच बियर शॉपीच्या नावावर देण्यात आलेल्या या परवान्यामध्ये बियर शॉपीचे प्रमाण सर्वाधिक आहे. बियर शॉपीकरिता देण्यात येणार्‍या परवान्यानुसार बियर शॉपीमध्ये मद्यपान करण्यास परवानगी दिली जात नाही. कामोठे वसाहतीमध्ये या नियमाला फाट्यावर मारून बियर शॉपीत खुलेआम मद्यपान केले जाते.

बिना परवानगी वाईन शॉप
सर्व प्रकारची मद्य विक्री करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. कामोठे वसाहत मात्र याला अपवाद आहे. वसाहतीत सेक्टर 14 आणि सेक्टर 21 या ठिकाणी काही दुकानदार दिवस-रात्र सर्वप्रकारच्या मद्याची विक्री करून बिना परवानगी वाईन शॉप चालवत आहेत. तर, सेक्टर 14 येथील एक विक्रेत्याने आपल्याला दुकानात मद्यासोबतच डिस्को क्लबच सुरु केले असल्याचे पाहायला मिळत आहे.

स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद
वसाहतीत सुरु असलेल्या या अवैध व्यवसायांना काही पोलीस कर्मचार्‍यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप राजाराम पाटील या नागरिकाने केला आहे. नवनियुक्त पोलीस अधिकारी या कर्मचार्‍यांची मक्तेदारी मोडीत काढतील, असा आशावाददेखील पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जुगाराच्या अड्ड्यांमध्ये भर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील जुगाराचे अड्डे एकीकडे बंद झाले आहेत. मात्र, त्याच वेळी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कांबळे यांची नियुक्ती होताच पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवपाडा गाव परिसरातील एका पार्किंगमध्ये वातानुकुलीत जुगार अड्ड्याची भर पडल्याचे पाहायला मिळत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी बोलणे टाळले
या सर्व प्रकाराबाबत प्रतिक्रिया विचारण्यासाठी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आपण या विषयावर समक्ष बोलू असे सांगून त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

कामोठे वसाहतीमध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेले धंदे बंद व्हावेत याकरिता वसाहतीमधील सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनी कायम प्रयत्न केले आहेत. कामोठे पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेले अधिकारी या धंद्यावर नियंत्रण मिळवतील, अशी अपेक्षा कामोठेकर करीत आहेत.

अमोल शितोळे, कामोठे शहराध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष
Exit mobile version