बाहेरून येणाऱ्या गणेशमूर्तींचा फटका

पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर परिणाम; ग्राहकांची वर्षागणिक संख्या रोडावली

| चिरनेर | प्रतिनिधी |

गेल्या कित्येक पिढ्यांपासून चिरनेर कलानगरीत गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जात आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल असून, सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या आणि एका बाजूला रंगकाम करण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच येथील मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र, चिरनेर कला नगरीसह संपूर्ण उरण तालुक्यात विक्रीसाठी बाहेरून आलेल्या तयार गणेशमूर्तींमुळे येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर येथे अनेक पिढ्यांपासून शाडूच्या गणेश मूर्ती बनविल्या जात आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याने तयार गणेश मूर्तींना रंगकाम करण्याचे काम अंतिम टप्प्यात येत आहे. मात्र, सध्याच्या स्पर्धात्मक आणि महागाईच्या युगात शाडूच्या गणेश मूर्तींकडे ग्राहकांची पाठ फिरत आहे. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिओपीच्या तयार गणेशमूर्ती आणून त्याची विक्री केली जाते. त्या वजनाने हलक्या असून, त्यांची किंमत शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत खुप कमी असते. त्यामुळे आजकाल गणेश भक्तांचा कल पीओपी मूर्तीकडेच जास्त आहे. त्यामुळे शाडूच्या मूर्तींची मागणी हळूहळू कमी होत चालली आहे. परिणामी चिरनेर येथील पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तिकरांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. खेड्यापाड्यात गणेश मूर्तींच्या विक्रीची दुकाने थाटली गेली असल्यामुळे, नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याची खंत येथील मूर्तिकार चौलकर, चिरनेरकर, हातनोलकर यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या पाच पिढ्यांपासून आजपर्यंत आमच्या कारखान्यातच 100 टक्के शाडू मातीच्या गणेश मूर्ती घडविल्या जातात. त्यामुळे शाडूच्या गणेश मूर्ती पसंत करणारे नवे-जुने ग्राहक आमच्या कारखान्यात येऊन, दोन महिने आधीच गणेश मूर्ती बुकिंग करतात. आम्ही ग्राहकांच्या पसंतीच्या फोटो नुसार गणेश मूर्ती साकारतो. परंतु, बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींमुळे आमच्या गणेश मूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

भाई चौलकर,
मूर्तिकार, चिरनेर

आमच्या कुंभार समाजाचा हा पिढीजात व्यवसाय असून, आता केवळ मूर्तिकला जोपासण्या पुरताच हा व्यवसाय उरला आहे. त्यात खूपच चढउतार आहेत. मात्र, या चढ-उताराची पर्वा न करता कला टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

नंदकुमार चिरनेरकर,
मूर्तिकार, चिरनेर
Exit mobile version