प्रांत कार्यालयाच्या आवारातील उंच भरावाचा फटका

शेजारी असलेल्या कार्यालयांमध्ये शिरले पावसाचे पाणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील तहसील कार्यालयालगत उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात खडीचा भराव करण्यात आला. मात्र, हा भराव अन्य कार्यालयांसाठी डोकेदुखी ठरला आहे. भरावामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पुरवठा निरीक्षक, संजय गांधी निराधार योजना आणि परिविक्षाधीन उपजिल्हाकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरूड कार्यालयात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे पाण्याने भरलेल्या कार्यालयात कामकाज करण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर आली.

अलिबागमध्ये तहसील कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय, पुरवठा शाखा, संजय गांधी निराधार योजना अशी वेगवेगळी कार्यालये एकाच जागेत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कामांसाठी नागरिकंची वर्दळ कायमच असते. या कार्यालयाच्या आवारात पूर्वी पाणी पावसाचे पाणी साचत असल्याने प्रशासनाकडून भरावाचे काम करण्यात आले. या परिसरात खडीचा भराव करीत असताना उपविभागीय अधिकारी कार्यालयात भराव उंच केला. त्यामुळे बुधवारपासून पडलेल्या पावसाचे पाणी अडले गेले. त्यामुळे या परिसरात पाणी साचले. पुरवठा निरीक्षक, संजय गांधी निराधार योजना आणि परिविक्षाधीन उपजिल्हाकारी तथा उपविभागीय अधिकारी मुरूड, रोजगार हमी योजना यांच्या कार्यालयात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे ही कार्यालये जलमय झाली होती. कार्यालयात पाणी साचल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. कामानिमित्त आलेल्या नागरिकांचे देखील हाल झाले. उपविभागीय कार्यालयाच्या आवारात केलेल्या उंच भरावाचा फटका शेजारी असलेल्या कार्यालयांना बसला असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

Exit mobile version