पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
| रायगड | प्रतिनिधी |
नवीन मोटार वाहन कायद्या विरोधात वाहतूकदारांनी तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. आंदोलनचा मंगळवारी दुसरा दिवस होता. सोमवारी वाहतूकदारांच्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. संपामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर लोकांनी सोमवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तेच चित्र आज सकाळी देखील पाहायला मिळाले. संपामुळे पालेभाज्या, दूध तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
देशभरातून संपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. नेहमीच कळंबोली येथील मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रकसह अन्य अवजड वाहनांची वाहतूक होताना दिसायची आंदोलनामुळे या ठिकाणी या वाहनांचा शुकशुकाट होता. त्यामुळे मार्गावर वर्दळ दिसून आली नाही. आंदोलनाचा परिणाम इंधनावर होणार असल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर धाव घेतली होती. अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहा, माणगाव, म्हसळा, महाड श्रीवर्धनसह अन्य तालुक्यांमधील पेट्रोल पंपावर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली.
केंद्र सरकारने नुकतेच संसदेत भारतीय न्याय संहिता विधेयक पारित केले आहे. या विधेयकात रस्ते अपघातात अपघातग्रस्तांना मदत केली नाही, तर आरोपींना होणाऱ्या शिक्षेबाबत, तसेच कारवाईच्या नियमावलीबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, अपघातात समोरच्या वाहन वा व्यक्तीला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या चालकांना 1 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा 7 लाख रुपये एवढा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा तरतुदी अन्यायकारक असल्याचा दावा करत ट्रकचालकांनी आंदोलन पुकारले आहे.