अवकाळीचा खरेदीवर परिणाम

| पाली | वार्ताहर |

दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या असताना बुधवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांसह व्यापारी, दुकानदारांची तारांबळ उडाली. तर, काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू झाला होता.

व्यापाऱ्यांनी दिवाळीसाठी लाखो रुपयांचा माल दुकानात भरून ठेवला आहे. परंतु पावसामुळे ग्राहकच न आल्याने खरेदी झाली नाही. शिवाय दुकानाबाहेर ठेवलेले सामान भिजल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. पावसामुळे फटाके भिजले आहेत. दुकानाबाहेर विक्रीसाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवलेले सामानही खराब झाले आहे. पणत्या, दिवे व रांगोळी ओली झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तर, कपडे खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

दिवाळीत बच्चे कंपनी किल्ले बनवण्यात मश्गूल असते. परंतु पावसाने मुलांनी बनवलेले किल्ले, तर काहींचा ढाचा तुटल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड झाला. पावसामुळे फटाकेही फोडता येत नाहीत. घराबाहेर हौशीने बनवलेले आकाश कंदील लावले होते. मात्र पावसात तेही भिजल्याने बच्चे कंपनी हिरमुसली.

Exit mobile version