इम्पॅक्ट खेळाडू नियमावर नाराजी

भारतीय संघालाबसतोय फटका

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर नियम हा खूप चर्चेचा विषय बनला आहे. या नियमानुसार, सर्व संघांकडे प्रत्येक सामन्यासाठी 5 इम्पॅक्ट प्लेयर असतात. त्यापैकी संघ एका खेळाडूचा वापर करू शकतो. प्रत्येक सामन्यात संघ या नियमानुसार एका खेळाडूचा वापर करतो. सामन्यादरम्यान एखाद्या संघाला फलंदाजाची गरज भासल्यास संघ एखाद्या खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर करतो, त्यानंतर अकरामधील खेळाडूला मैदानाबाहेर बसावे लागते. जर एखाद्या संघाला गोलंदाजाची गरज असेल तर संघ गोलंदाजाचा वापर करतो. आयपीएलमधील सर्व संघ या नियमाचा पुरेपूर फायदा घेत असले तरी या नियमाचा थेट परिणाम अष्टपैलू खेळाडूंवर होताना दिसत आहे. जे भारतासाठी चांगले नाही.

एका माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूने इम्पॅक्ट खेळाडू या नव्या नियमाबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, इम्पॅक्ट खेळाडू हा नवा नियम आयपीएलमध्ये गाजतोय. क्रिकेटप्रेमींनाही हे आवडत आहे; पण भारतीय क्रिकेट संघाला या नव्या नियमाचा फटका बसतो आहे. नव्या नियमामुळे पूर्णपणे तंदुरुस्त नसलेला हार्दिक पंड्याही गोलंदाजी करीत आहे. इम्पॅक्ट खेळाडू हा नियम नसता, तर चेन्नईकडून शिवम दुबेला सातत्याने गोलंदाजी दिली गेली असती; पण आता नव्या नियमामुळे त्याला गोलंदाजी देण्यात येत नाही. त्यामुळे निवड समितीला शिवम कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतो, हेच माहीत नाही. राहुल तेवतिया हा खरेतर अष्टपैलू खेळाडू; पण त्याची इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवड केली जाते, त्यामुळे फिरकी गोलंदाजासाठी ओळखल्या जाणार्‍या तेवतिया याला गोलंदाजी करता येत नाही.

Exit mobile version