महागाव-कोरखंडे रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य

। तळा। वार्ताहर।

तळा तालुक्यातील महागाव ते कोरखंडे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे ग्रामस्थांसह गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महागाव-कोरखंडे रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सध्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर चाकरमानी गावी परतले आहेत. मात्र गावच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत महागाव ग्रामपंचायतीतर्फे उपअभियंता बांधकाम विभाग अलिबाग यांना पत्राद्वारे सदर खड्डे भरण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र याला महिना भराचा कालावधी उलटत आला तरी त्याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. या रस्त्यावरून बस, टेम्पो यांसह दुचाकी, चारचाकी वाहनांची कायम वर्दळ असून ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना खड्डयातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version