महागाव फाटा ते ताडगाव व दुधणी रस्त्याची दुरावस्था
शाळकरी मुले, रुग्ण, वृद्ध, महिलांचे हाल
| पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील महागाव फाटा ते ताडगाव व दुधणी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. शाळकरी मुले, रुग्ण, वृद्ध व महिला आदींची खराब रस्त्यामुळे खूप गैरसोय होते. शिवाय अनेक समस्या उद्भवत आहेत. रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर ग्रामस्थ आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहेत. या खराब रस्त्यामुळे सणासुदीला गावी येणारे चाकरमानी व स्थलांतरित कामगारांनी गावाकडे चक्क पाठ फिरवली आहे. याचा प्रत्यय होळी, गुढीपाडवा आदी सणांना आला आहे. ही बाब चिंताजनक आहे.
जवळपास दुधनी, ताडगाव, कोडब्याची वाडी, खेमवाडी आणि घोडगावच्या सात वाड्या यांना हा जोडणारा रस्ता आहे. येथील शेकडो ग्रामस्थ व प्रवासी दळणवळणासाठी या रस्त्यावर अवलंबून आहेत. शोकांतिका म्हणजे महागाव फाटा ते दुधनी हा रस्ता अजून शासनाकडून बनवलेला नाही. याशिवाय दुधनी ते ताडगाव रस्ता 2002 साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून बनला आहे. मात्र सद्यस्थितीत त्याचीही दुरावस्था झाली आहे. आणि दुरुस्ती देखील झालेली नाही. परिणामी या खराब रस्त्यांवरून धोकादायकरित्या येथील ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहे. तसेच गावातून कामानिमित्त तात्पुरते स्थलांतरित झालेले ग्रामस्थ तर खराब रस्त्यामुळे सणासुदीला सुद्धा गावी येण्यास धजावत नाहीत.
बायको-मुलांना हौसीने गावी घेऊन यायचे किंवा मित्रांना गावी घेऊन यायचे आणि या खराब रस्त्यावरून प्रवास करायला अनेकांना आवडत नाही. गावी आल्यावर कामानिमित्त किंवा फिरायला वारंवार बाजार किंवा शहराच्या ठिकाणी जावे लागते. आणि मग या खराब रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे खूप गैरसोय होते. अपघाताचा धोका देखील आहे. परिणामी हे टाळण्यासाठी गावी न येणेच अनेक जण नाईलाजाने स्वीकारत आहेत. असे येथील तरुण सचिन साठे यांनी सांगितले. याबरोबर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला.
खराब रस्त्यामुळे हाल
आधीच इथल्या लोकांची परिस्थिती खूप बेताची आहे. महिन्याचे वाणसामान व आठवड्याचा भाजीपाला आणायचा असेल, काही इमर्जन्सी असेल, शेतीचे सामान असेल किंवा शासकीय कामे आदी कामांसाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. मात्र रस्ता खराब असल्यामुळे या सर्व ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. शिवाय कोणी आजारी पडले एखादी महिला गरोदर असेल तर त्यांना या खराब रस्त्यावरून रूग्णालयात नेण्यास उशीर होतो. त्यांचे हाल सुद्धा होतात. खराब रस्त्यामुळे जीव सुद्धा गमवावा लागू शकतो. शाळकरी व महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होते.
एसटी बंद होण्याची भीती
येथील लोकांचे प्रमुख दळणवळणाचे साधन एसटी आहे. आणि जर रस्ता वेळेवर झाला नाही तर एसटीपण बंद होऊ शकते.
खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत मार्फत प्रयत्न करत आहोत. प्रशासनाने याची दखल घ्यावी. – करुणा साठे, सरपंच, ताडगाव
ग्रामपंचायतीकडून रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव आल्यास, पंचायत समिती मार्फत संबंधित विभागाकडे तो पाठवला जाईल. – अशोक महामुनी, गटविकास अधिकारी, पाली-सुधागड