। पनवेल । प्रतिनिधी ।
68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दोन अज्ञात व्यक्तींनी पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांचे सात तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात तोतया पोलिसांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरीष माने असे फसवणूक करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे राहतात. माने हे आठ दिवसांपूर्वी गोदरेज सिटी, ठोंबरेवाडी, पनवेल येथे त्यांच्या मुलीकडे राहण्यास आले होते. पहाटेच्या वेळी ते गोदरेज सिटीपासून ठोंबरेवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत होते. याचदरम्यान दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले व त्यांनी ते सीआयडी पोलीस असून, दोन दिवसांपूर्वी प्रकाश पाटील यांना गांजा विक्री करताना पकडले आहे, म्हणून या भागात आम्ही तपासणी सुरू केली असल्याचे त्यांना सांगितले. तसेच, तुम्ही तुमच्या अंगावरील दागिने काढून खिशात ठेवा, असे सांगून त्यांनी माने यांना आपले ओळखपत्र दाखवले. त्यावर माने यांनी सोन्याची चेन, कडे आणि अंगठी काढून त्यांच्या टी-शर्टच्या खिशात ठेवली. मात्र, या दोघांनी त्यांना दागिने अशाप्रकारे खिशात ठेवू नका, रुमालात गुंडाळून ठेवा, असे सांगत त्यांनी हे दागिने रुमालात ठेवण्याचा बहाणा करीत त्यांच्याकडील रुमाल आपल्या हातात घेत दुचाकीवरून पलायन केले.
याप्रकरणी अज्ञात तोतया पोलिसांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले
