| मुंबई | प्रतिनिधी |
पोलीस असल्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एका वृध्द महिलेच्या दोन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्या. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्यावरील ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. मालाडमध्ये राहणाऱ्या गोदावरी सिंग (70) यांची अशाच प्रकारे दोन भामट्यांनी फसवणूक केली. त्या मंगळवारी सकाळी कांदिवली येथील न्यू लिंक रोडडवर गाईला चपाती देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून दोन इसम त्यांच्याकडे आले. आपण पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोघांनी सिंग यांना बोलण्यात गुंतवले आणि हातचलाखीने त्यांच्याकडील 30 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या. या बांगड्यांची किंमत 1 लाख 95 हजार रुपये आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार चारकोप पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.






