धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा

| खोपोली | प्रतिनिधी |

मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी ‘हर हर चांगभले’ धनगर समाज संस्था खालापूर यांनी खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन दिले आहे. चौंडी येथे 6 सप्टेंबरपासून यशवंत सेनेने आमरण उपोषण सुरू केले असून या आमरण उपोषणाला हर हर चांगभले धनगर समाज संस्था खालापूर यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.

आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी अहमदनगर येथे यशवंत सेनेचे पदाधिकारी आणि समाज बांधवानी 6 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा 12 वा दिवस चालू असून उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर खालापुरात धनगर समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा ‘हर हर चांगभले’ धनगर समाज संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर समाज बांधव शेखर बंगाले यांनी भंडारा उधळला. त्यावेळी त्यांना विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली. याचाही निषेध या निवेदनात नोंदविण्यात आला आहे. सरकारने चौंडी येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाला भेट देऊन यशवंत सेनेची मागणी मान्य करून समाजाला न्याय द्यावा. अशी मागणी आज निवेदनात केली आहे. यावेळी हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष हरेश ढेबे, ठकुराम झोरे चंद्रकांत हिरवे, दत्ता हिरवे, जनार्धन गोरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version