| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक 5 जानेवारीला बंद ठेवली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी योगश म्हसे यांनी जारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम येत्या 5 जानेवारीला लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाच्या परिसरात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे 1 लाख लाभार्थी येणार आहेत. त्यांच्या वाहतुकीसाठी 2 हजार बसेस आणि शेकडो चारचाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. यामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी, या मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने जनसमुदाय, कार्यकर्ते येणार असून सुमारे दोन हजार बसेस व इतर लहान मोठी वाहने असणार आहेत. या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून उपाय योजना म्हणून पाच जानेवारी रोजी 1.00 वाजल्यापासून ते रात्री 11.00 वाजेपर्यत दूध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्ग क्र.66 या महामार्गावरुन गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या कशेडी ता.पोलादपूर ते खारपाडा ता.पेण पर्यंत व मुंबई बाजूकडून येणाऱ्या खारपाडा ता.पेण ते कशेडी ता.पोलादपूरकडे जाणाऱ्या वाहनांना तसेच खोपोली-पालीफाटा ते वाकण महामार्ग क्रमांक 584(अ) या महामार्गावरुन गोवा बाजूकडे जाणाऱ्या व मुंबई बाजूकडे येणाऱ्या अशा जड अवजड वाहनांकरीता वाहतूक बंद करण्याबाबत तसेच सकाळी 8.00 ते दुपारी 12.00वाजेपर्यंत व दुपारी 3.00 ते रात्री ते रात्री 10.00 या कालावधीत गोवामार्गे येवून मुंबईकडे जाणारी वाहने ही मोर्बेमार्गे माणगाव अशी वळविण्यात येणार आहे, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत.







