| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
संकष्टी चतुर्थीला रविवार सुट्टीचा दिवस आल्याने अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत हजारो भाविक श्री बल्लाळेश्वराच्या चरणी लीन झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी रायगड कोकणासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते. अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत संकष्टी चतुर्थीला भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. बल्लाळेश्वर मंदिर व गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्यात आली होती. श्री बल्लाळेश्वरला देखील आभूषण व वस्त्र परिधान करण्यात आले होते. तसेच मंदिराबाहेर रांगोळीदेखील काढण्यात आली होती. श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह विविध भागातून भाविक दाखल झाले होते. यामुळे येथे चांगली आर्थिक उलाढाल झाली असून येथील स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.
भाविकांमुळे येथील हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग बोर्डिंग वाले, पापड, लोणचे मिरगुंड विक्रेते, पेढेवाले, छोटे मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत होता. मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते. परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविकांच्या सोयीसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. विविध वस्तूंनी भरलेली दुकाने व गर्दी यामुळे मंदिर परिसर गजबजलेला दिसत होता. मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
भाविकांच्या येणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन योग्य व्यवस्थापन व नियोजन करण्यात आले होते. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली होती. नाममात्र दरात प्रसादालयामध्ये प्रसाद (भोजन) सोय करण्यात आली. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त आधुनिक भक्त निवास, रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड, वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग तसेच सुसज्ज स्वच्छतागृहदेखिल आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही. देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्वतोपरी योग्य व्यवस्था करण्यात आली असल्याचे बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले.







