महत्वाची बातमी! ‘या’ रस्त्यावरुन प्रवास टाळा

| रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील सारसोली गावानजिक असलेल्या रस्त्याला भेगा गेल्या आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याची माहिती सारसोलीचे उपसरपंच, रोहा बाजार समिती सदस्य चंद्रकांत धोरे यांनी दिली.

हे गाव डोंगराला लागून असून, या परिसरात सुमारे 190 घरे असून,लोकसंख्या 519 इतकी आहे. सतत पडणाऱ्या पावसाने सारसोली ते टिटवी दरम्यानच्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्ताही कमकुवत झाल्याने प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.या परिसरातच करंजी, कापरी ही दोन गावे येतात.त्यांचाही येण्याजाण्याचा मार्ग बंद झालेला आहे.

या संदर्भात तहसिलदारांकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती धोरे यांनी दिली.प्रशासनाने तातडीने योग्य ती खबरदारी करुन गावाच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करावी,अशी मागणीही त्यांनी केली.सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाने रोह्याला जोडणारा रस्ताही पावसाच्या पाण्याने बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे.दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास मदत पोहोचणे अशक्य होईल,असेही धोरे यांनी सांगितले.

यासंदर्भात तलाठी विशाल चोरगे यांनी रस्त्याला भेगा पडल्याने तो तातडीने दुरुस्त केला जावा,अशी ग्रामस्थांची मागणी आहे.त्यासाठी आपण तहसिलदारांना माहिती दिलेली आहे. नागरिकांनीही सुरक्षितपणे प्रवास करणे गरजेचे आहे,असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version