माथेरानमधील महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत

| माथेरान | प्रतिनिधी |

पर्यटननगरी माथेरानमध्ये आजही अनेक महत्वाचे पॉईंट्स सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत. वेळीच या मुख्य पॉईंट्सला गतवैभव प्राप्त करून दिले नाही तर हळूहळू हे पॉईंट नामशेष होण्याच्या मार्गावर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

माथेरान याठिकाणी थंड हवा, शुद्ध वातावरण आणि स्वच्छ सुंदर निसर्ग ह्या व्यतिरिक्त अन्य काही करमणुकीची साधने उपलब्ध नाहीत की, ज्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करता येऊ शकते. पर्यटनात वाढ होऊ शकते असा एकही महत्वाकांक्षी प्रकल्प आजतागायत कोणत्याही सत्ताधारी गटाने राबविलेला नाही. ठराविक पॉईंट्सवर सेल्फी झोन अथवा पर्यटकांना विश्रांती घेण्यासाठी अद्ययावत सोयीसुविधा, धूळविरहित रस्ते, मुलांना खेळण्यासाठी साहित्य असे कोणतेही विकासात्मक काम करण्यात आलेले नाही. दर पाच वर्षांनी तेच तेच जाहीरनामे आणि पोकळ आश्वासने देऊन सर्वसामान्य लोकांची एकप्रकारची फसगत होत असते. महत्वाचा भाग म्हणजे येणाऱ्या पर्यटकांमुळेच इथे सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. नगरपरिषदेला प्रवासी कराच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे येणारा पर्यटक सातत्याने इथे यायला हवा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक व्यक्त करताना दिसत आहेत.

लहान मोठे असे एकूण 38 पॉईंट्स आहेत. यांपैकी दरवर्षी निदान महत्त्वाच्या नेहमीची वर्दळ असणाऱ्या चार पॉईंट्सचे उत्तम प्रकारे सुशोभीकरण केल्यास पर्यटकांसाठी सोयीचे ठरू शकते. काही पॉईंट्स वरील संरक्षण रेलिंग तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. अशा पॉईंट्सवर महाबळेश्वरप्रमाणे या पॉईंट्सचे रुपडे पालटले तर पर्यटनात वाढ होऊन सर्वानाच रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. स्थानिक लोक सर्व प्रकारचे शासनाचे कर नियमितपणे भरत असतात, त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी सत्ताधारी गटाने प्रामुख्याने आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे जाणकार मंडळी बोलत आहेत.

Exit mobile version