| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये पर्यटकांनी शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नेहमीप्रमाणेच घाटरस्त्यात वाहनांची कोंडी झाल्याने अनेकांना दुसऱ्या, आणि तिसऱ्या वळणावरून मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरीकडे पायी चालत यावे लागले. याठिकाणी प्रशासनाचे सुयोग्य नियोजन नसल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यातच सध्या अवकाळी पाऊस पडत असल्याने येथील परिसर गर्द धुक्याने अच्छादला गेला होता. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना आपण ढगांच्या सान्निध्यात आल्याचा भास होत होता. तसेच, रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर अनेकांना सेल्फीचा मोह देखील आवरता आला नाही. त्यातच या धुक्याच्या चादरीचे विहंगमय दृश्य विविध पॉईंट्स वरून न्याहाळताना मिळणारा आनंद अवर्णनीय असल्याचे देखील पर्यटकांकडून सांगण्यात आले. शारलोट लेकवरील ओसांडून वाहणारा पाण्याचा छोटासा धबधबा सुरू झाला नसून पर्यटकांनी या अवकाळी पावसात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद लुटला आहे.