| कोर्लई | वार्ताहर |
पावसाळा सुरु होताच मुरुडमधील शासकीय कार्यालयांना गळती लागते. त्यामुळे या गळतीवर उपाय म्हणून दरवेळेला प्लास्टिकचा आधार घेण्याची वेळ येत आहे.
मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, वनविभाग, पंचायत समिती, सेतू, ग्रामीण रुग्णालय अशी विविध शासकीय कार्यालये असून काही कार्यालयांत महत्त्वाचे दस्तावेज असतात. गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सुरू होताच मुरुडमधील तहसील कार्यालय व ग्रामीण रुग्णालयात गळती सुरू होते. या गळतीला उपाय म्हणून कार्यालयांच्या छतावर प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणांहून शासकीय कामासाठी या ठिकाणी लोकांची लगबग असते. त्यामुळे येथील काही कार्यालयांत पावसाळ्यात होणारी गळती कायमस्वरुपी थांबण्यासाठी शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी जनमानसातून जोर धरीत आहे.