वातावरण बदलामुळे साथीचे आजार बळावले
| म्हसळा | वार्ताहर |
हवामानात बदल झाल्याने रोहिणी नक्षत्र सुरू होण्याआधीच राज्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मे महिन्यातच सातत्यपूर्ण पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, म्हसळा तालुक्यात मे महिन्यात 85 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
अवकाळी पाऊस दरवर्षीच पडतो. परंतु, चालु वर्षी जून महिन्यात जसा पाऊस पडतो तसा पाऊस मे महिन्यात पडत असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपापल्या गावात येऊन विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असतात. परंतु, मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेक कार्यक्रमांत व्यत्यय आला असून, नागरिकांची हिरमोड झाली आहे. त्याचबरोबर मे महिन्यात कोकणातील रानमेवा काजू, आंबे व फणस खाण्याची चांगलीच चंगल असते. परंतु, त्या वरही पावसाचे पाणी पडले आहे. एकदा का पाऊस पडला की जाणकार पाऊस पडलेले फळ खात नाहीत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, 25 मे रोज रोहिणी नक्षत्र सुरू झाले असून खऱ्या अर्थाने शेतात पेरणीला सुरुवात करण्यात आली. मात्र, अवकाळी पाऊस पडल्याने शेतात पेरलेले बी बियाणे कशी उगवतील, त्याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने गवताची उगवण होऊन हिरवळ पसरली आहे. शेत जमीन ओली व भुसभुशीत झाली असल्याने शेतात पेरणी केल्यावर उगवण कशी होईल, यांची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.