अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची गांधी चौकात निदर्शने
| उरण | प्रतिनिधी |
अशोक खरात या नाशिक मधील स्वयंघोषीत भोंदू बाबाचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत. अशा बाबा-बुवांच्या नादी लागणारे राजकीय पुढारी, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि भविष्य चाचपडणाऱ्या उच्चभ्रू व अन्याय अत्याचार झालेल्या महिला यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आयुष्य उध्वस्त करणाऱ्या विकृत अशोक खरातला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणी करून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने निदर्शने केली.
या अशोक खरातनी निर्माण केलेल्या मंदिर व ट्रस्टच्या नावाखाली 105 कोटी रुपयांचा निधी शासनाचे विविध विभागाने वळविला आहे. सोबतच 48 कि.मी. लांबीची स्वतंत्र जलवाहिनी व एक लाख क्षमता असलेली पाण्याची टाकी बनवून दिली आहे. सुमारे 300 हून अधिक व्हिडीओ काल परवापर्यंत पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले आहेत. अशा या विकृत नराधमाला व त्याला सहाय्य करणाऱ्या मंत्री, शासकीय अधिकारी व स्थानिक स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत उरण शहरातील बाझारपेठेत असलेल्या महात्मा गांधी चौक येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने निदर्शने केले. निदर्शने करून त्यांनी या नराधमाचा जाहीर निषेध केला आहे.
आपल्या देशात आणि राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन, संवैधानिक मुल्ये आणि सामाजिक न्यायाच्या मुल्यांना मुठमाती देवून धर्मांधता आणि त्यातून येणारे अज्ञान, बुवाबाजी आणि अंधभक्ती हि मोठ्या प्रमाणावर वाढीला लागली आहे. हे समाजाचे अपयश तर आहेच पण सत्ता मिळविण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत चुकीच्या मुल्यांना खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीचे हे फलित आहे. त्यामुळे या प्रकरणात जर आरोपींना वाचविण्याचे, चौकशीत त्रुटी ठेवण्याचे, दिरंगाई करण्याचे प्रयत्न आढळून आले तर अखिल भारतीय जनवादी महिला संघटना सर्व समविचारी शक्तींना सोबत घेवून तिव्र आंदोलन उभे करेल असा इशारा संघटनेने या निवेदनामार्फत दिला आहे. सदर संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.







