उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे अशक्य;फडणवीसांचे भाकीत

। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणं बाकी आहे. त्याबाबत त्यांना प्रश्‍न विचारला असता हे मोठं भाकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज मुंबई तकच्या बैठक कार्यक्रमात आले होते. त्याच कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे.

ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पाहिली आहे त्यांच्या हे लक्षात आलं असेल की उद्धव ठाकरे हे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत. त्यांचं सरकार परत येऊ शकणार नाही. मी वकील आहे. मी हे सांगू शकतो की उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हे त्यांना परत आणून बसवणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज बांधणं योग्य राहणार नाही. जी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की निकाल योग्य पद्धतीने लागेल.असेही ते म्हणाले.

आजच माझं भाकीत सांगतो की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ. त्यामुळे हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पवारांचे सुचक मौन
भाजपबाबत राष्ट्रवादीची भूमिका समर्थन देणारी असल्याने राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का असा प्रश्‍न शरद पवार यांना विचारला गेला. त्यांनी उत्तर देण्याचे टाळलं. भाजपसोबतच्या आघाडीवर शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आता सांगता येणार नाही. महाविकास आघाडी सध्या तरी एकत्र असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. तसेच दिल्लीत झालेल्या राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होते. मात्र, मला इथे काही कामे होती. मी शुक्रवारी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे. आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले.

Exit mobile version