। मुंबई । प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही हे कालच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्यावरील कारवाई ही शिस्तभंगाची कारवाई आहे, असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. तसेच, शिवसेनेचे आमदार हे शिंदे गटाला जाऊन मिळतील, हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत कालच्या ईडी चौकशीवरही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. तसेच, राज्यात नवं सरकार, नवीन विटी, नवीन दांडू, असं म्हणत राऊतांनी नवनिर्वाचित सरकारला टोला हाणला आहे. त्याचप्रमाणे, मलाही गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता, दबावही होता, पण मी गेलो नाही, असा खळबळजनक खुलासाही राऊतांनी केला आहे.
मी फुटणारा बुडबुडा नाही : संजय राऊत
राज्यसभा निवडणूकीत मला पाडण्याचा प्रयत्न झाला. मी राज्यसभा निवडणुकीत पडलो असतो, तरी मी शिवसेना सोडली नसती, मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत राहिलो असतो. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच राहिलो असतो. मी बाळासाहेब यांच्या मूळ विचाराचा माणूस आहे. मी फुटणारा बुडबुडा नाही.असंही राऊत म्हणाले.