। केप टाऊन । वृत्तसंस्था ।
ठरावीक डावांनंतर फलंदाजीत होणार्या घसरगुंडीकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे, असे मत कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसर्या कसोटीतील पराभवानंतर केले. “फलंदाजीबाबत आम्हाला अधिक विचार करावा लागणार आहे, यात शंका नाही. ठरावीक डावांनंतर फलंदाजांची हाराकिरी संघाच्या दृष्टीने अनुकूल नाही. आम्हाला याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,’’ असे कोहली म्हणाला.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर आफ्रिकेच्या संघाने दमदार पुनरागमन केले. याबाबत यजमानांचे कौतुक करतानाच त्याने भारतीय संघाकडून काही चुका झाल्याचेही मान्य केले. “आम्ही पहिल्या सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. त्यानंतरच्या दोन्ही कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी भेदक मारा केला. आम्ही लक्षपूर्वक खेळ करण्यात कमी पडलो आणि आफ्रिकेने याचा फायदा घेतला. त्यांनी ही मालिका जिंकणे हा योग्यच निकाल आहे,’’ कोहलीने नमूद केले.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. या दोघांना मागील दीड-दोन वर्षांत धावांसाठी झगडावे लागल्याने त्यांचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आले आहे. मात्र, कर्णधार कोहलीने त्यांच्या भविष्याबाबत काहीही स्पष्टपणे बोलणे टाळले. पुजारा आणि रहाणेच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे का, असे विचारले असता कोहली म्हणाला, “भविष्यात काय होणार हे मी आताच सांगू शकत नाही. हे निर्णय माझ्या हातात नाहीत. तुम्ही हे प्रश्न निवडकर्त्यांना विचारा. ते काय निर्णय घेणार हे मला इथे बसून सांगणे अवघड आहे.’’