| पेण | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर वडखळ ग्रामपंचायतीने पेण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे वडखळ ग्रामपंचायत आता रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत पेण तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे. जिल्हास्तरीय परीक्षणामध्ये ग्रामपंचायतीच्या विकासकामांना आणि प्रभावी नियोजनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने वडखळ ग्रामपंचायतीला जिल्ह्यातही प्रथम क्रमांक मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, डिजिटल सेवा, लोकसहभाग आणि शाश्वत विकास अशा विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन केले जाते. या सर्व निकषांमध्ये वडखळ ग्रामपंचायतीने प्रभावी नियोजन, दर्जेदार अंमलबजावणी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात अव्वल स्थान मिळवले आहे. वडखळ ग्रामपंचायतीची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे गडथ फाऊंडशेनच्या सहकार्याने उभारलेला आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प. रायगड जिल्ह्यात अशा स्वरूपाचा प्रकल्प राबविणारी वडखळ ही एकमेव ग्रामपंचायत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पामध्ये ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण केले जाते. त्यामुळे हा उपक्रम जिल्हास्तरीय परीक्षणात विशेष आकर्षणाचा विषय ठरला. या यशामागे ग्रामपंचायत सरपंच शिवानी म्हात्रे, उपसरपंच योगिता मोकल, ग्रामपंचायत ग्रामअधिकारी श्रीहरी खरात, पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी, विविध समित्या, स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.







