भारताचा अपमान करणार्‍या कलाकारांना तुरुंगात टाका

सुनील पाल हास्य कलाकार यांचे प्रतिपादन
। उरण । वार्ताहर ।
भारताच्या गौरवशाली गोष्टींविषयी सर्वांना अभिमान आणि आदर असला पाहिजे. अमेरिकेत जाऊन आपल्या भारताची बदनामी करणार्या वीर दास यांच्या वक्तव्याची मी निंदा करतो. हास्य-कलाकाराचे काम निखळ विनोदातून लोकांना हसवणे असतांना देशाची बदनामी करणे, अश्‍लील-गलिच्छ विनोद करणे, शिवीगाळ करणे, हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरणे हा एकप्रकारचा वैचारिक आतंकवाद आहे. हे लोक समाजाचे शत्रू आहेत. देशाच्या शत्रूला जी शिक्षा दिली जाते तीच शिक्षा त्यांना द्यायला हवी. त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय तेे सुधारणार नाहीत, असे रोखठोक प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध हास्य कलाकार सुनील पाल यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती आयोजित कॉमेडियन नव्हे, राष्ट्रद्रोही!, या ऑनलाईन विशेष परिसंवादात ते बोलत होते.
यावेळी मुंबई येथील सॅफ्रन थिंक टँकचे संस्थापक सिद्धांत मोहिते म्हणाले की, भारतात दिवसा महिलेची पूजा होते आणि रात्री गँग रेप केला जातो असा दुष्प्रचार करणारे वीर दास एकटे नाहीत, यात बॉलीवूडमधील काही मोठी मंडळी सहभागी आहेत. तसेच नवी दिल्ली येथील हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे म्हणाले की, देवीदेवता, संत, राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, भारतमाता यांच्याविषयी विनोद करून लोकांच्या मनातील श्रद्धा कमी करण्याचा हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे आमचीही मागणी आहे की, केंद्र सरकारने श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कठोर कायदा करायला हवा. यापुढे देवता आणि श्रद्धास्थाने यांचा अपमान हिंदू सहन करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version