। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महावितरणच्या तंत्रज्ञाला शिविगाळ करून मारहाण करणे पेणमधील तिघांना चांगलेच महागात पडले आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने दोन महिलांसह एकाला या प्रकरणी सक्त मजूरीची शिक्षा सुनावली आहे. निशा नितिन ठाकूर, शोभा अशोक ठाकूर आणि अशोक ठाकूर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही पेण तालुक्यातील मळेघर गावचे रहिवासी आहेत.
ही घटना 19 मे 2021 रोजी घडली होती. ललित गजानन ठाकूर हे महावितरण कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तौक्ते वादळामुळे पेण तालुक्यातील काही भागात विजेचे पोल आणि तारा पडून वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ललित ठाकूर आणि त्यांचे सहकारी प्रयत्न करत होते. मात्र तीनही आरोपींनी आमच्या जागेतून वीजेचा पोल हलवा, असे म्हणत त्यांना काम करू दिले नाही. शिविगाळी करून कर्मचार्यांना परत पाठवले. 19 मे 2021 रोजी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ आणि कर्मचारी पुन्हा एकदा काम करण्यासाठी तिथे आले. यावेळी तिनही आरोपींनी ललित ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांना शिवीगाळी करण्यास सुरवात केली. तर निशा ठाकूर यांनी लाकडाने मारहाण करीत त्यांना दुखापत केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश 1 अशोक कुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात झाली. यावेळी सरकारी अभियोक्ता म्हणून प्रमोद प्रभाकर हजारे यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. ज्यात फिर्यादी ललीत ठाकूर, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अभिशेक थोरात, मकरंद पाटील, तपासिक अंमलदार मिनल शिंदे यांची साक्ष महत्वाची ठरली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिनही आरोपींना सहा महिने सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर 2 हजार रुपये दंडही ठोठावला.