। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील रामवाडी येथील रॉयल गार्डियल या इमारतीमध्ये श्रीवर्धन येथील संदीप केळसकर यांचे कुटुंबीय भाड्याने राहत होते. संदीप केळसकर यांच्या मुलाला पेण या ठिकाणी नोकरी लागल्यामुळे अंदाजे एक ते दीड महिन्यापूर्वी संदीप केळसकर यांचे कुटुंब रॉयल गार्डियल या इमारतीमध्ये भाड्याने राहत होते. रविवारी त्यांच्या पत्नी लिफ्टमधून जात असताना लिफ्ट पाचव्या मजल्याजवळ आली असता बंद पडली. त्यांनी अलार्मचे बटन दाबले. त्यानंतर लगेचच बिल्डिंगचे सिक्युरिटी गार्ड त्याठिकाणी दाखल होऊन चावीने लिफ्टचा दरवाजा उघडून त्यांना खाली उतरवत असताना, त्यांचा पाचव्या मजल्यावरून लिफ्टमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करत आहेत. संगीता केळसकर यांच्या झालेल्या अपघाती निधनाने श्रीवर्धन शहरातील केळसकर पाखाडी परिसरात शोककळा पसरली आहे.