अजितदादांचा भाजपच्या सुरात सूर
मुंबई | प्रतिनिधी |
कुणी जर चुकलं, तर त्याला 4 तास बाहेर ठेवा. 4 तास कमी वाटत असतील, तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम 12-12 महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना केले. यापूर्वी भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन झाले आहे. हे निलंबन मागे घ्यावे, अशी भाजपची मागणी आहे. या अनुषंगाने अजित पवारांनी सभागृहात आज भाजपच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे सभागृहातील अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आमदार निलंबनावर अजित पवार म्हणाले की, कधी कधी काही प्रसंग घडतात. ते तेवढ्या पुरते घ्यायचे असतात. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी चर्चा करून त्यातून मार्ग काढायचा असतो. आणि वेळ मारून न्यायची असते. त्याबद्दलही दुमत नाही. जोपर्यंत कुणी जर चुकीचं असेल, तुम्ही नियम करत नाही, तोपर्यंत चुकायचं थांबणार नाही. माझी विनंती आहे की, कुणी जर चुकलं तर त्याला नियम करा आणि चार तास बाहेर ठेवा. तरी त्याला त्याची चूक कळेल. चार तास कमी वाटत असेल तर एखादा दिवस बाहेर ठेवा. त्याचाही विचार करा, पण एकदम बारा बारा महिने कुणाला बाहेर पाठवू नका, असे म्हणत त्यांनी याप्रश्नी आपण भाजपसोबत असल्याचेच दाखवून दिले.