गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा

सांगोला येथे आ. पाटील यांची माहिती
कोळा | वार्ताहर |
शेकापचेे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीबद्दल विविध अफवा पसरल्या होत्या. आबासाहेबांच्या प्रकृतीतील सुधारणा हा एक दैवी चमत्कारच आहे.जनतेच्या आशीर्वादाने त्यांची प्रकृती सध्या सुधारत असल्याची माहिती शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी दिली आहे.
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची तब्येत सुधारावी अशी प्रार्थना राज्यभरातून होत आहे. विविध पक्षांचे व संघटनांचे प्रमुख व पदाधिकारी सतत संपर्कात आहेत. आबांनी आयुष्यभर वंचित, शोषितांची सेवा केली असून या पुण्याईच्या जोरावर त्यांना दीर्घायुष्य लाभेल, अशी आशाही व्यक्त केली.
जयंत पाटील यांनी सोलापुरातील अश्‍विनी हॉस्पिटलमध्ये भाई गणपतराव देशमुख यांनी भेट घेऊन, प्रकृतीची माहिती घेतली. त्यानंतर जयंत पाटील सांगोला येथील गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन आबासाहेबांच्या पत्नी रतनकाकी देशमुख यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. यावेळी जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांची प्रकृती स्थिर असून जे कार्यकर्ते सांगोल्याकडे येत होते. त्यांनी माघारी फिरावे असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू असून हातापायाची हालचाल सुरू आहे. गणपतआबा लवकर बरे होतील असा विश्‍वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी हॉस्पीटल परिसरात गर्दी करू नये. जो पर्यंत पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून अधिकृत माहिती मिळत नाही. तोपर्यंत त्या माहितीवर विश्‍वास ठेऊ नये असेही पाटील यांनी सांगितले. आबांच्या प्रकृतीबद्दल समाजमाध्यमांमध्ये अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र, आबांची प्रकृती सध्या स्थिर असून चुकीच्या माहितीवर विश्‍वास ठेऊ नका,असे त्यांनी सांगितले. यावेळी सभापती राणी कोळवले ,जगदिश कुलकर्णी,अनिल खरात,यशवंत गावडे सलीम मुलानी अरुण बोत्रे यांच्यासह शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version