हेटवणे धरणातून अशुद्ध पाणीपुरवठा

| चिरनेर | वार्ताहर |

हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून गढूळ व दूषित पाणी पुरवठा बऱ्याच दिवसांपासून होत असून, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी चिरनेर , दिघोडे, वेश्वी, जांभूळपाडा, नवापाडा या ग्रामीण विभागातील गावातून, गेली असल्यामुळे, नवी मुंबई बरोबर या ग्रामीण भागातील अनेक गावांना गढूळ व दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. या गढूळ व दूषित पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, पटकी ,कावीळ यासारखे साथीचे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान हेटवणे धरणातून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची बाब लक्षात घेऊन, जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची तपासणी करून गुणवत्ता पडताळण्यात यावी ,तसेच फिल्टर केलेले पाणी या परिसरातील जनतेला वितरित करावे, अशी मागणी चिरनेर परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे साथीचे आजार बळवण्याची शक्यता आहे. मलेरिया, डेंगू या आजाराने उरण तालुक्यात डोके वर काढले आहे. गढूळ व दूषित पाण्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.

सचिन घबाडी, सामाजिक कार्यकर्ते चिरनेर
Exit mobile version