जलशुद्धीकरण न करता थेट वितरण
ग्रामपंचायत सदस्याचा घरचा आहेर
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये नव्याने नागरीकरण झालेल्या वसाहतीसाठी नळाचे पाणी देण्याची ग्रामपंचायतीची योजना आहे. मात्र, नदीमधून ते पाणी उचलून ते पाणी नवीन वसाहत भागात जलवाहिनीमधून वितरित केले जात आहे. दरम्यान, उल्हास नदीमधील हिरवेगार तवंग असलेले पाणी कोल्हारे ग्रामपंचायत साथीचे आजार आणण्यासाठी अशुद्ध पाण्याचा पुरवठा करीत आहे, असा आरोप खुद्द ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केला आहे. ग्रामपंचायतीमधील सत्ताधारी गटाला घरचा आहेर एका ग्रामपंचायत सदस्याने दिला असल्याने कोल्हारे ग्रामपंचायत खरोखर अशुद्ध पाणी देत आहे काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे.
कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये कोल्हारे, धामोते आणि बोपेले येथे असलेली निवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. ग्रामपंचायतीने आपल्या भागातील रहिवाशांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायतीने आर्थिक नियोजन करून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्या जलवाहिन्या टाकण्यासाठी तब्बल चार ठिकाणी नेरळ-कळंब रस्ता खोदण्यात आला आहे. काळ्या रंगाच्या रबरी जलवाहिन्या नवीन वसाहत भागात पाणी देण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आल्या. परंतु, त्या जलवाहिनीमधून घरोघरी वितरित होणारे पाणी कोणत्या प्रकारचे आहे, याचा अभ्यास लघुपाटबंधारे विभागाने केला आहे काय? असा प्रश्न विजय हजारे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत गरमपंचायत सदस्य विजय हजारे यांनी थेट नदीमधून कोणत्या अधिकारात पाणी उचलले जात आहे यासाठी पाटबंधारे विभागाने कधी परवानगी दिली आणि थेट नदीमधून पाणी उचलण्याची परवानगी दिली आहे काय? याची माहिती पाटबंधारे खात्याने द्यावी, अशी मागणी केली आहे. तर कर्जत पंचायत समितीने नवीन वसाहत भागात आणि डिसकव्हर रिसॉर्ट ला देण्यात आलेल्या पाण्याची तपासणी तात्काळ करावी, अशी मागणी देखील विजय हजारे यांनी केली आहे. तर जलवाहिनी टाकण्यासाठी विनापरवाना रस्ते खोदणार्या संबंधित यांच्यावर कारवाई अशी मागणी देखील विजय हजारे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायतीमधील सत्ताधार्यांनी मनमानी करून जलवाहिनी टाकली आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत असून ग्रामपंचायत सदस्य हजारे यांनी याबाबत आवाज उठल्याने कोल्हारे ग्रामपंचायतीसाठी हा घरचा आहेर आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
धनेश्वरी येथे उल्हास नदीमधून पाणी उचलण्यात आले आहे. तेथे असलेल्या धामोते नळपाणी योजनेच्या विहिरींमधून ते पाणी जलवाहिनीतून न सोडता थेट नदीमधून उचलून जलवाहिनीमधून घरोघरी पाठवले जात आहे. त्यात ज्या उल्हास नदीमधून पाणी उचलले आहे, त्या उल्हास नदीला गेल्या काही वर्षांपासून जलपर्णी आणि हिरव्या शेवाळीने व्यापले आहे. ते पाणी थेट नदीमधून उचलून नवीन वसाहत भागात सोडले जात आहे. त्यात तेथील योजनेत जलशुद्धीकरण केंद्रदेखील नाही आणि त्यामुळे नागरी भागाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे, असा आरोप खुद्द कोल्हारे ग्रामपंचायतीचे सदस्य विजय हजारे यांनी केला आहे. गढूळ आणि अशुद्ध पाण्याचे वितरण करून कोल्हारे ग्रामपंचायत अशुद्ध पाण्यामुळे साथीच्या रोगांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे नवीन वसाहत भागातील रहिवाशांनी आपल्याकडे येणार्या पाण्याची शुद्धता तपासण्याची गरज आहे किंवा ते उकळून घ्यावे, असे आवाहन विजय हजारे यांनी केली आहे.







