। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।
कोरिया ओपन सुपर 500 मधील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. पीव्ही सिंधूला महिला एकेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्याचवेळी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतही पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीत दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचा दक्षिण कोरियाच्या आन सियोंगने 14-21, 17-21 असा पराभव केला.
दुसरीकडे पुरुष गटात पुन्हा एकदा श्रीकांतला उपांत्य फेरीच्या पलीकडे प्रगती करता आली नाही. त्याचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जोनाथन क्रिस्टीने 50 मिनिटांच्या लढतीत 19-21, 16-21 असा पराभव केला. गेल्या महिन्यातही श्रीकांतला स्विस ओपनच्या उपांत्य फेरीत क्रिस्टीजविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.