| लॉस एंजलिस | वृत्तसंस्था |
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष अधिकृतपणे थांबला असला, तरी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील इराणचा सहभाग असलेल्या सामन्यात मोठा तणाव कायम राहिला. फिफाने नाकारलेली विनंती, देशांतर्गत राजकीय विरोध अशा प्रतिकूल परिस्थितीतही इराणचा संघ विश्वचषकात खेळण्यासाठी उतरला आणि आपल्या मोहिमेची सुरुवात कमालीच्या जिद्दीने केली. सोमवारी रात्री झालेल्या अटीतटीच्या सामन्यात दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करताना इराणने न्यूझीलंडला 2-2 असे बरोबरीवर रोखले. सामन्यापूर्वी अनिवासी इराणी चाहत्यांनी निदर्शने करत देशातील सरकारला विरोधही दर्शवला.
इराणकडून रामिन रेझायान याने स्वत: एक गोल (32व्या मिनिटाला) केला आणि मोहेब्बीच्या गोलसाठी (64व्या मि.) सुंदर पास (असिस्ट) दिला. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून इराणी संघाचा विश्वचषक प्रवास प्रचंड उलथापालथीचा ठरला आहे. इराणची तिन्ही साखळी सामने अमेरिकेबाहेर हलवण्याची विनंती फिफाने फेटाळली. यानंतरही इराणने स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. लॉस एंजलिस येथे झालेल्या सामन्यात इराणला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. न्यूझीलंडसाठी दोन्ही गोल एलाया जस्टने केले.
रेझायानचे वक्तव्य, मोहेब्बीच्या कृतीने वाद युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला खेळातील कौशल्यपेक्षा राजकीय वलयच अधिक होते. त्याचे पडसाद सामन्यात आणि सामन्यानंतरही पाहायला मिळाले. बरोबरी साधणारा दुसरा गोल केल्यावर इराणच्या मोहम्मद मोहेब्बी याने दोन बोटे हवेत उंचावून बंदुकीतून गोळी झाडल्यासारखा इशारा करत जल्लोष केला. त्याच्या या कृतीने वाद निर्माण झाला. त्याचवेळी अनिवासी इराणी चाहत्यांच्या राष्ट्रगीताला विरोध करण्याच्या कृतीविषयी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रेझायानने दिलेले उत्तरही असेच वादग्रस्त ठरत आहे. हा आमचा वैयक्तिक विषय असून आम्ही तो सोडवू, तुम्ही काळजी करू नका, असे उत्तर त्याने पत्रकारांना दिले.
प्रेक्षकांचा पाठिंबा
टीम मेल्ली या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या इराण संघाने तणावग्रस्त पार्श्वभूमीवर विश्वचषक मोहिमेची सुरुवात लॉस एंजलिस जवळील सोफाय स्टेडियमवर शानदार बरोबरीने केली. या भागात इराणी लोकांची जगभरातील (मायदेश वगळता) सर्वांत मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे मैदानात इराणला पाठिंबा देणारा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्याच वेळी स्टेडियमबाहेर शेकडो इराणी-अमेरिकन नागरिक सरकारचा निषेध करत होते, तर अनिवासी इराणी चाहत्यांनी राष्ट्रगीतादरम्यान मैदानाकडे पाठ फिरवून आपला निषेध नोंदवला. मात्र, सामना सुरू होताच हा सर्व विरोध, निषेध मावळला आणि जवळपास सर्वच चाहत्यांनी इराणी खेळाडूंना मनापासून पाठिंबा दिला.







