| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा शहरातील एका पानटपरीवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर म्हसळा पोलिसांनी धाड टाकून गुटखा जप्त केला आहे. तसेच, टपरी चालक प्रीतम धिमर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावावर यापूर्वीही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.
दिघी नाका येथील पोलीस चौकीसमोरील पानटपरीवर एका ग्राहकाला गुटखा विक्री करण्यात आला. मात्र, दुसऱ्या ग्राहकाला गुटखा देण्यास नकार दिल्याने ग्राहक व टपरी चालक यांच्यात वाद निर्माण झाला. या वादानंतर संबंधित ग्राहकाने आरडा ओरडा करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित टपरीवर छापा टाकला. या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ‘विमल’ व तत्सम प्रकारचा गुटखा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करून संबंधित टपरी चालकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने अन्य ठिकाणाहून गुटखा खरेदी करून किरकोळ विक्रीसाठी आणत असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. रायगड जिल्ह्यातील विविध भागांत मुंबईहून खासगी वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होत असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. आरोपी प्रीतम धिमर याच्याविरुद्ध म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







