| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीत धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भ्रष्टाचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यापूर्वी झालेल्या जुन्या रस्त्याचे फोटो वापरून 15व्या वित्त आयोगातून 3 लाख 2 हजार 773 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, एका जागरूक ग्रामस्थाने ही बाब निदर्शनास आणली आहे.
नेरळ ग्रामपंचायत मधील 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘मेरी पंचायत’ ॲपवरील नोंदींची पडताळणी करताना एका जागरूक नागरिकाच्या निदर्शनास आले की, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 3 लाख, 2 हजार 773 चे बिल काढण्यात आले असून, त्यासाठी वापरण्यात आलेले छायाचित्र प्रत्यक्षात एक वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्याचे आहेत. या रस्त्यावरील कोनशिला स्पष्टपणे दर्शवितो की, हे काम जनसुविधा लेखाशीर्षांतर्गत करण्यात आले होते. फलकावर नमूद माहितीनुसार, रस्त्याचे काम दि.30 ऑक्टोबर, 2024 रोजी पूर्ण झाले होते. म्हणजेच हा रस्ता 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून झालेला नसून, त्यावेळी अस्तित्वात असलेल्या वेगळ्या निधीतून पूर्ण करण्यात आला होता.
दरम्यान, याच रस्त्याचे छायाचित्र ‘मेरी पंचायत’ ॲपवर 15व्या वित्त आयोगाच्या कामाच्या नोंदीसाठी वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संबंधित कामासाठी बिल देखील काढण्यात आल्याची नोंद आढळून आली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, ज्या रस्त्याचे काम 2024 मध्ये पूर्ण झाले होते, त्याच कामाचे फोटो नव्या निधीअंतर्गत दाखविले जाणे हा केवळ तांत्रिक दोष नसून, सार्वजनिक निधीच्या वापराबाबत गंभीर स्वरूपाचा मुद्दा मानला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कोणते काम करण्यात आले, त्याची पडताळणी कोणी केली आणि बिल मंजूर करताना कोणत्या आधारावर प्रक्रिया राबविण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.







