तीर्थक्षेत्र पालीत अशुद्ध पाणी पुरवठा

नागरिकांनी भरला अडीचपट पाणीपट्टीचा भार

| सुधागड -पाली | वार्ताहर |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहरातील नागरिकांना आता वाढीव पाणीपट्टीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण नगरपंचायतने वार्षिक पाणीपट्टी 300 रुपयांवरून थेट 1080 रुपये केली आहे. पाणीपुरवठा करण्यासाठी येणारे 50 ते 55 लाखांचे वीजबिल व देखभाल दुरुस्ती खर्च भागविण्यासाठी ही पाणीपट्टी वाढविण्यात आली आहे. असे असले तरी पालिकारांच्या नशिबी अजूनही अशुद्ध व गढूळ पाणीच आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू बरोबर अन्य वस्तूंचे दर वाढत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला महिन्याचे बजेट भागवताना उसनवार करावी लागत आहे. आता पाली नगरपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागातर्फे चालू वर्षात पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे.

सर्वसाधारण नळधारकाला पूर्वीपेक्षा साधारण 780 रुपये जास्त नळपट्टी भरावी लागणार आहे. मात्र असे असले तरी पाणी शुद्ध व नियमितपणे मिळणार नाही. येथील अंबा नदीतून पाली नगरपंचायत प्रशासनातर्फे पाली शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जॅकवेल येथून पंपाद्वारे पाणी सरसगडाच्या पायथ्याशी असलेल्या साठवण टाक्यांमध्ये सोडले जाते, व येथून पालिकरांना पाणी पुरविले जाते. तर काही ठिकाणी थेट अंबा नदीतून पाणी पुरविले जाते. दिवसेंदिवस पाण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यामुळे नळ जोडणी धारकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे काही भागात कमी दाबानेही पाणीपुरवठा होत आहे. असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पालकर यांनी सांगितले.

पालीकर व भाविकांना दूषित पाणी पुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पालीत साधारण अडीच हजार नळ कनेक्शन आहेत. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

शुद्ध पाणी योजनेचा विसर
शुद्धपाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. सद्यस्थितीत पालीकरांसाठी जवळपास 27 कोटिंची शुद्धपाणी पुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजुनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मागील वर्षी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन दिले होते. दीड वर्ष होऊन गेले तरी अजून काहीच झालेले नाही. प्रशासन व राजकारण्यांना पालीकरांचे हाल दिसत नाहीत. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या पंपांचे वर्षाला साधारण 50 ते 55 लाख रुपये वीजबिल येते. शिवाय देखभाल दुरुस्तीचा खर्च वर्षाला 10 ते 15 लाख इतका येतो. आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून 300 रुपये प्रमाणे केवळ 5 ते 6 लाख रुपये वसुली होते. यामुळे इतर विकासकामे करतांना अडचणी येतात. त्यामुळे सर्व खर्च भागविणे व विकास कामांना वेग आणण्यासाठी पाणीपट्टी थोडी वाढविण्या शिवाय पर्याय नव्हता. वाढलेली ही पाणीपट्टी दिवसाला फक्त 3 रुपये याप्रमाणे आहे आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी ती योग्य आहे. नागरिकांवर कोणताच अतिरिक्त भार आलेला नाही. शिवाय येत्या काही दिवसांत 21 कोटी रुपयांच्या शुद्धपाणी योजनेच्या कामास सुरुवात होईल.

प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली
Exit mobile version