तिरंदाजीत धीरज, अंकिताची उपांत्यपूर्व फेरीत धडक

| पॅरिस | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील सातव्या दिवसाच्या खेळांना सुरुवात झाली आहे. या दिवशी तिरंदाजीतील मिश्र दुहेरीचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये शुक्रवारी भारताकडून धीरज बेम्मादेवरा आणि अंकिता भकत या दोघांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले आहे. धीरज आणि अंकिता यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या दिआनंद कोइरुनसिमा आणि अरिफ पेंगस्तू यांना 5-1 गुणांच्या फरकाने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडीने 37-36 अशा एका पाँइंटच्या फरकाने आघाडी घेतल्याने त्यांना 2 गुण मिळाले. दुसरा सेट 38-38 असा बरोबरीत राहिल्याने दोन्ही जोड्यांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. त्यानंतरच्या तिसऱ्या सेटमध्ये 38-37 अशा फरकाने भारताने आघाडी घेतली आणि 2 गुण मिळवले. त्यामुळे अंकिता आणि धीरज यांनी विजय निश्चित केला. दरम्यान, आता उपांत्यपूर्व फेरीत अंकिता आणि धीर यांचा सामना स्पेनच्या एलिया कॅनालेस आणि पाब्लो गोन्झालेज अछा या जोडीविरुद्ध होणार आहे. स्पेनच्या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जोडीला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता भारत आणि स्पेन यांच्यात होणारा उपांत्यपूर्व सामना शुक्रवारीच म्हणजे आज संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे. जर हा सामना जिंकला, तर आजच संध्याकाळी 7 वाजता उपांत्य सामनाही पार पडेल. आणि त्यानंतर पदकांसाठीच्या लढतीही होणार आहेत. ऑलिंपिक गाजवणारा दुसरा कोल्हापूरकर. धीरज आणि अंकिता हे वैयक्तिक प्रकारातही सहभागी झाले होते. मात्र त्यांना राऊंड ऑफ 32 च्या पुढे जाता आले नाही. तसेच भारताच्या महिला आणि पुरुष तिरंदाजी संघांचा सांघिक प्रकारातही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Exit mobile version