दिघी, खांदेरी प्रकल्पातून अन्याय झाल्यास आंदोलन

जिल्हा कोळी समाज संघाचा इशारा
| अलिबाग | विशेष प्रतिनधी |
दिघी पोर्ट व थळ येथे खांदेरी प्रकल्प राबविताना स्थानिक मच्छिमारी गावावर अन्याय झाल्यास जिल्ह्यातून मोठे आंदोलन उभारण्यात येईल,असा इशारा रायगड जिल्हा कोळी समाज संघातर्फे देण्यात आला आहे.

रायगड जिल्हा कोळी समाज संघाची बैठक रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी उरण, पेण, अलिबाग,मुरुड, तळा ,श्रीवर्धन , या तालुक्यातील प्रमुख मच्छिमार नेतेमंडळी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा कोळी समाज संघाचे अध्यक्ष धर्मा नागू घारबट (वरसोली), सचिव प्रविण तांडेल,अलिबाग, जितेंद्र कोळी, उरण, ज्ञानदेव तांडेल तेरा गाव, मेघनाथ सारंग अलिबाग, देविचंद कोळी पेण, बोर्ली सरपंच चेतन जावसेना, नंदू रघुवीर श्रीवर्धन, अलका मोन्नाक, मुरुड गोरक्षनाथ नवरीकर थेरोंडा, नरसिंह मानाजी, मुरुड, मनोहर गुलु, भरडखोल, पांडुरंग चेवले श्रीवर्धन आदी गाव अध्यक्ष, चेअरमन, सरपंच, गाव पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत मच्छिमार सोसायटीमध्ये सरकारने वाढिवलेले डिझेलचे दर कमी करावेत, रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे सीमांकन मोजणी, मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छिमाराच्या कागदोपत्रासाठी होणारी पिळवणूक, तरुण पिढीसाठी रोजगाराचे नियोजन करणे. या विषयावर चर्चा होऊन शक्य तेथे पत्रव्यव्हार व कायदेशीर लढा दिला जाईल असे सभेमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आले.

Exit mobile version